Tuesday, March 22, 2011

मृत्यु आणि मृत्युंजय

आज दिनांक २३ मार्च, आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांचा ७७ वा हौतात्म्यदिन. ध्येयाप्रत समर्पित जीवन आणि हौतात्म्य याचा एक नवा आदर्श या त्रिमूर्तीने निर्माण केला.
या काळात हे तीन वीर व विशेषत: सरदार भगतसिंह हे हिंदुस्थानच्या जनतेच्या गळ्यातले ताईत झाले होते. अर्थात प्रस्थापित नेत्यांना ते परवडणारे नव्हते. त्यांना हिंसक ठरवून त्यांचा धिक्कार करणाऱ्यांनी त्यांच्यावर चालविण्यात आलेला अभियोग हा अत्यंत अयोग्य पद्धतिने, न्यायपद्धतिला हरताळ फासून व या तिघांना फासावर लटकावायचेच असे मनोमन ठरवून चालविण्यात आला याविषयी मात्र ’आळी मीळी गुपचिळी’ हे सोयिस्कर धोरण स्विकारले. किमान सत्याचा उदो उदो करणाऱ्या व न्यायाचा प़क्ष घेण्याचा दावा करणाऱ्या गांधी महाशयांनी सरकारला या संदर्भात जाब विचारु नये हे फार काही सांगुन जाते. या घटनेनंतर सुमारे पंधरा वर्षांनी म्हणजे जेव्हा सत्तेचे सिंहासन अगदी जवळ आले होते आणि त्याप्रत लवकरात लवकर पोचुन तसेच त्यामार्गे भरघोस लोकप्रियता मिळविण्यासाठी आझाद हिंद सेनेच्या वीरांची वकिली करण्यासाठी (भुलाभाई देसाई प्रभृतिंच्या अधिपत्याखाली का होईना)  वकिली झगा चढविणारे नेहेरु मात्र या वेळी गांधींना दुखावणे हे आपल्याला पेलणारे नाही, उद्या सत्ता मिळेल तर ती गांधीकृपेनेच हे धूर्तपणे ओळखून होते.

मुळात या तिघांवर दाखल केलेला अभियोग हा हत्येचा नव्हता तर ’राजद्रोहाचा, सरकार उलथुन टाकण्याच्या प्रयत्नाचा’ होता हे त्यांच्या वरील आरोपपत्र वाचताच लक्षात येते. या आरोपपत्राचा सारांश असा:
"वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकायांसह १९२४ सालापसून ते अटक होइपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले  सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.
हे उद्दीष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून हि उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी ’हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ व ’हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून  त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आअणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढिल मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला:-
१) बॅंका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.
२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॉंब व स्फोटके यांची निर्मिती करणे.
३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे सहाय्यक वा पक्षपाती असणाया पोलिस वा इतर अधिकायांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टात खंड पाडणाया तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणाऱ्या लोकांचे वध करणे.
४) आगगाड्या उडवीणे
५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वांग्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे
६) वैध बंदिवासातुन दंडितांची व इतरांची सुटका करणे
७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे व
८) हिन्दुस्थानात क्रांती घडवुन आणण्यात स्वारस्य असणाऱ्या परदेशातील व्यक्तिंकडुन वर्गणीच्या रुपात पैसा गोळा करणे."
सदर आरोपपत्र वाचताच प्रत्य्रेक भारतियाची मान अभिमानाने उंचावेल, कि स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होवुन गेला.
या वीरांना कुणाच्या टिकेचे वा असूयेचे यत्किंचितही सोयर सुतक नव्हते. ’आपण अवलंबिलेला हिंसक मार्ग चुकिचा आहे व आपल्याला केल्या कृत्याचा पश्चात्ताप होत आहे’ असे जाहिर करण्याच्या बोलीवर नेहेरुंनी त्यांची रदबदली करण्याचा प्रस्ताव या हौतात्म्याला आसुसलेल्या तरुणांना तुरुंगात धाडला होता. मात्र नंतर उत्तर देउ असे मोघम उत्तर देत सरदार भगतसिंगांनी त्याक्षणी त्या नेत्यांवर कसलीही टिका केली नाही व त्यांचा अवमानही केला नाही हा त्यांचा खरोखरच मोठेपणा मानावा लागेल. मात्र दिनांक ३ मार्च १९३१ पर्यंत ’दयेचा अर्ज’ करण्याची मुदत असल्याचा फायदा करून घेत ’मृत्युचे निवेदन’ मात्र सरकारला सादर केले.
या तेजस्वी निवेदनात त्यांनी असे निवेदित केले होते की
"आमच्या विरुद्ध इंग्लंडचे बादशाह पाचवे जॉर्ज यांच्या विरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.आणि न्यायालयने आम्हाला त्या साठी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तेव्हा इंग्लंड नि हिंदुस्थान या दोन राष्ट्रात युद्ध सुरू आहे आणि आम्ही युद्धबंदी आहोत हे उघड होते. आमच्या काही पुढाऱ्यांना सवलती देउन तुमच्या सरकारने आपल्या बाजुला ओढले नि त्यांनी तरुणांचा विश्वासघात केला याची आम्हाला चिंता नाही. ज्या स्त्रियांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली आहे, पतीचे बलिदान दिले, भावाचा बळी दिला नि स्वत:चाही होम केला त्या आमच्या पार्टीच्या सदस्य आहेत म्हणून त्यांना त्या ’हिंसेवर विश्वास ठेवतात’ असे सांगुन हे राजकिय पुढारी आपल्या शत्रू समजतात. त्याचेही आम्हाला दु:ख नाही. पण तरीही हे युद्ध सुरुच राहील. स्वतंत्र आणि समाजवादी प्रजासत्ताक राज्य स्थापित होईपर्यंत हे युद्ध भडकतच राहील. आमचे बलिदान जतिंद्रनाथ  नि भाई भगवतीचरण यांच्या बलिदानाने उज्ज्वल केलेल्या इतिहासाचा अध्याय मोठा करील. आपण आम्हाला फासावर लटकाविण्याचा निश्चय केलेला आहे, व तसे करणारच! आम्ही कधी आपलयाला विनंती केली नाही किंवा दयेचे भीक मागीतली नाही.
आम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती अशी की तुमच्या न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही युद्ध पुकारले होते व म्हणुनच आम्ही युद्धबंदी आहोत. तेव्हा आम्हाला युद्धाबंद्यांप्रमाणेच वागविण्यात यावे अशी आमची मागणी आहे. तुमच्या न्यायालयाने जे म्ह्टले तेच तुम्हाला मनापासून म्हणायचे होते हे सिद्ध करणे आणि ते कृतिने सिद्ध करणे हे आता तुमच्याच हाती आहे! आमची तुम्हाला अगदी मनापासूनची एक विनंती आहे आणि तुम्ही ती मान्य कराल अशी आशा आहे की, तुम्ही आपल्या सैनिकी विभागाला एक सैन्यपथक वा बंदूकधारी पथक पाठवुन आम्हाला गोळ्या घालुन सैनिकाप्रमाणे मारण्याचे आदेश द्यावेत"
२३ मार्च १९३१ रोजी सायंकाळी सात नंतर म्हणजे निर्धारित दिवसाच्या एक दिवस आधीच फाशी देण्यासाठी जेव्हा या तीन वीरांना फाशीच्या तख्त्याकडे नेण्यात आले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या दंडाधिकाऱ्याला उद्देशून सरदार भगतसिंग म्हणाले " तुम्ही भाग्यवान आहात. हिंदुस्थानी क्रांतिकारक आपल्या सर्वोच्च ध्येयासाठी मृत्युला आनंदाने कसे कवटाळतात हे आज प्रत्यक्ष पाहायचे भाग्य आपल्याला लाभले आहे"
संध्याकाळी सात वाजुन तेहेतीस मिनिटांनी हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव इन्किलाब झिंदाबादच्या घोष्णा देत फासावर गेले.
आज सत्त्याहत्तराव्या हौतात्म्यदिनी त्यांना सादर वंदन.

SOURCE
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
(तारखे प्रमाणे )

"निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"
-
समर्थ रामदास

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥
- महात्मा फुले!

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, ज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असे, तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती.
आजच्या या पावन दिनी जिजाऊ.कॉम तर्फे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

"
शिवरायांचे ते आठवावे रूप .. शिवारयांचा अठावावा प्रताप ... भूमंडळी " अशा आपल्या या अखंड प्रेरणा स्तंभाला आज परत एकदा स्मरण करण्याचे आवाहन जिजाऊ.कॉम आपणा सर्वांना करत आहे.


कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !
अरे छत्रपतीला स्मरा एकदा, शिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदर, अन तुम्हीच हो कोलंबस !
खरच आज गरज आहे त्या स्फूर्तीची, तमाम मावळ मातीमध्ये रुजवलेल्या त्या दिव्य स्वप्नाची, स्वराज्याच्या स्वप्नाची. सामान्य माणसाच्या स्वप्नातील स्वराज्याची, याच साठी शिवरायांनी जीवनभर एकच वसा घेतला होता तो म्हणजे माणसे घडवण्याचा आणि त्यांना एकत्र जोडण्याचा. आपल्या कर्मानेच आपल्या राष्ट्राची निर्मिती आथवा विकृती सुद्धा होत असते हा विचार त्यानी स्वराज्यातील लोकांमधे खोलवर रुजविला . म्हणूनच तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर, जिवा महाले असे अनेक ज्यांची इतिहासामधे साधी नोंद पण नाहीए असे लोक स्वराज्या निर्मिती च्या कार्या मधे कामी आले.त्या सर्वांच्या मनामधे एकच भावना होती ती म्हणजे-स्वराज्य निर्मिती हे आमचे कार्य आहे आणि आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण स्वराज्याची घौड्दौड, शिवबाची घौड्दौड कधी ही थांबली नाही पाहिजे! आज आपण पण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला काही बदल हवा असल्यास तो बदल आपणच घडवून आणला पाहिजे. लोकसभा किंवा विधानसभे मधे बदल घडवून आपल्या देशाचे भवितव्य बदलणार नाही; त्या साठी गरज आहे आपल्याला बदलण्याची, आपले विचार बदलण्याची, आपल्या विचारणा एक योग्या दिशा देण्याची. देशाची कमान जो पर्यंत एक दिशा आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणांकडे आसणार नाही तो पर्यंत या देशाला साक्षात ब्रम्हदेव सुद्धा वाचवू शकनार नाही. काळ फार कठीण आहे मित्राणो, गरज आहे आता आपल्यालाच पेटून उठण्याची, डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची, भाषेची आणि आपल्या संस्कृतीची सुरक्षा करण्याची; गरज आहे मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची!

शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर आसताना हे कार्य कठीण नाही, छ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाही, त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असते. शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि कधी आले तरी ते तुमच्या आमच्या हाता मधे ढाल-तलवार देणार नाहीत, आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे. शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडून, आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती, भाषा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहे; त्या साठी लढायचे आहे, तेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची ही वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाही. जिजाऊ मा साहेबांच्या, शिवबाच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला दिसेल.

चला तर मग जमेल तेथे जमेल त्या मार्गाने समाजातील अनिष्ट चालीरीती, जातीभेद, अज्ञान,
शासनातील किंवा इतर ठिकाणचा भ्रष्टाचार आणि एका प्रगत राष्ट्राला जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा विरोध करू!


शेवटी स्वाभिमानाच्या सूर्याला, पर्वतासारख्या खंबीर राजाला, जिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!

पुन्हा एकदा शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!

Thursday, March 17, 2011

शहाजीराजे भोसले

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व!
जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ 3 वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते.
फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसल्यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा 1603 साली विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. 1624). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर 1639 साली आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.
शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.
दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता 25 जुलै, 1648 चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. 16 मे, 1649 रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.
शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
  • इ. स. 1625 ते 1628 - आदिलशाही
  • इ. स. 1628 ते 1629 - निजामशाही
  • इ. स. 1630 ते 1633 - मुघलशाही
  • इ.स. 1633 ते 1636 - निजामशाही
  • इ.स. 1636 पासून पुढे - आदिलशाही
पुढे 1661-62 दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध 5, म्हणजेच 23 जानेवारी,1664 रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
एक शूर मराठा सरदार. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजांचे पिता व राजमाता जिजाबाई यांचे यजमान.

Tuesday, March 15, 2011

शिवसेनेची ऐश्वर्या रायला तंबी

मराठी माणसाला आपलीशी वाटणारी एकमेव पक्ष या महाराष्ट्रात जन्माला आला तो म्हणजे शिवसेना. शिवसेना होती आणि आहे म्हणून महाराष्ट्रात मराठी माणूस टिकला. हे सर्व खर आहे. भाजप य्रोबर युती करून राज्यात सत्ता आणली. मराठी माणसासाठी खूप काही केले. हा झाला शिवसेनेचा इतिहास. आजही शिवसेना चांगली कामे करीत आहे त्याबद्दल वाद नाही. मनसे आणि शिवसेना जर एकत्र नंदू नाही शकल्या तरी एकमेकांचे पाय तरी ओढणार नाहीत.
आता मुळ मुद्याच बोलूया. हिंदी फिल्म अभिनेत्री ऐश्वर्या रोय हिला शिवसेनेने कन्नड परिषदेत भाग घेऊ नये असे बजावले असतानाही तिने या परिषदेत भाग घेतला. ठीक आहे याचा अर्थ आम्ही समाजाला कि ती कानाडींच्या बाजूने आहे.  तर सांगायचं अस कि शिवसेनेला ऐश्वर्या राय हिला का विरोध करायचा होता कारण ती महाराष्ट्रात कमावते व कर्नाटकात गेली. पण मला एकाच विचारायचं आहे शिवसेनेला कि, ज्या कर्नाटकात सत्तेत भाजप आहे, ती भाजप कर्नाटकातील मराठी लोकांवर अत्याचार करते तर मग शिवसेना महाष्ट्रात भाजप बरोबर युती का करून आहे? जर शिवसेनेने युती केली आहे तर तिला ऐश्वर्याला बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. कि कर्नाटकातील  भाजप वेगळी आहे व महाराष्ट्रातील भाजप वेगळी आहे? शिवसेनेने भाजपशी युती तोडावी व मनसे बरोबर एकाच मंचावर यावे.
वाचकांनी कृपया आपली मते जरूर नोंदवावी

Saturday, March 12, 2011

खंडोबा

खंडोबा हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा,बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे); कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. [१] खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र ; चतुर्भुज; कपाळाला भंडारा असे रूप असते
नावे
एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसर्‍या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे एक कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.
कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे: खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.
दैवत
 खंडोबा म्हाळसा मणीमल्लांचा संहार करताना (मूळ शिळाचित्राचे साल - १८८०)
खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे. [३] खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात.[४] खंडोबावरिल सर्वाधिक महत्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात असल्याचा दावा करतो पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही.[५] मुळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रूद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला. [६] खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तीपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटिय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बीदरजवळचे आदी मैलार स्थान आहे असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी -> नळदुर्ग -> पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला.[७] मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापा-यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा. पैठणच्या मराठी कंडक यक्षाशीही या देवतेचे एकीकरण झाले आहे.
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. एकनाथांनी या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून कमी प्रतीचे दैवत मानले गेले.[ संदर्भ हवा ] खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रीविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.
महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तण्ड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.[८]
जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. [९] बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.
कुळाचार
हे दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे.
  • जागरण - गोंधळ :
देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
  • तळी भरण:
तळी भरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरूषांद्वारे बेल भंडारा सुपारीने देवतेची ओवाळणी केली जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला असावा.
उपासना
बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्व असून कांदा त्यास आधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात. [११] याशिवाय रगडा भरित आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखवितात[१२] खंडोबाचे उपासक ब्राह्मणांसारख्या जातीव्यवस्थेतील वरच्या जातीपासून लिंगायत, धनगर, मराठा अशा सर्व जातंमध्ये आढळतात. हे दैवत सकाम दैवत असल्याने अनेक नवस केले जातात
मल्हारी माहात्म्य

संस्कृत व मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्वाचे स्थान दिले. हा ग्रंथ (बहुदा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने) इ.स.१२६० - १७४० च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे.[१३] खंडोबाने मणी व मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात बावीस अध्याय आहेत. ग्रंथाचा सर्वसाधारण गोषवारा असा -
अध्याय

वर्णन
१ मंगलाचरण, मणीचूर्ण पर्वतावरील सप्तऋषींच्या कुटिरांचे वर्णन, मल्हासूर कुटिरे उद्ध्वस्त करतो. ऋषी इंद्राकडे जातात.
२ इंद्रदरबाराचे वर्णन, इंद्राची मदत करण्याबाबत असमर्थता, वैकुंठात जाऊन विष्णूची मदत घेण्याचा सल्ला
३ वैकुंठाचे वर्णन, ऋषी विष्णूची स्तुती करतात व मदतीची याचना करतात.विष्णू ऋषींसोबत कैलास पर्वतावर येतात.
४ कैलास पर्वताचे वर्णन, कैलासाची शोभा बघून ऋषी व विष्णू यांना झालेला आनंद.
५ शंकराच्या महालाचे वर्णन.
६ शंकर-पार्वती यांच्या दिव्य रूपाचे वर्णन.
७ ऋषी शंकराची स्तुती करतात, शंकर ऋषीगणांस अभयदान देतो, धृतमरीचा जन्म.
८ शंकर मार्तंडभैरव अवतार घेतो, देवसैन्याचे वर्णन, युद्धास निघतात.
९ मल्लासूरास देवसेनेच्या आक्रमणाची खबर मिळते, दैत्यगणांची युद्धतयारी.
१० युद्धाचे वर्णन.
११ कार्तिकेय व खंडगदृष्याचे युद्ध, कार्तिकेयाचा विजय.
१२ गणपती व उल्कामुखाचे युद्ध,गणपतीचा विजय; नंदी व कुटिलोमाचे युद्ध नंदीचा विजय.
१३ मणीदैत्य व खंडोबाचे युद्ध, मणीचा वध.
१४ विष्णू मल्लासूरास समजावण्याचा प्रयत्न करतात, मल्लासूर सल्ला धुडकावून युद्धास जातो.
१५ धृतमरी आणि मल्लासूराचे युद्ध, धृतमरीचा पराभव.
१६ मल्लासूराचे व खंडोबाचे युद्ध, मल्लासूराचा पराभव.
१७ मल्लासूराकडून खंडोबाची स्तुती, खंडोबा मल्लासूरास वर देतो.
१८ ऋषींच्या विनंतीनुसार मणीमल्लांच्या वधस्थळी दोन लिंगे प्रकट होतात, देवगण त्यास्थळी तीर्थयात्रेसाठी येतात.
१९ प्रेमपुरी यात्रेचे महत्व, .
२० प्रेमपुरी स्थळाचे वर्णन.
२१ खंडोबाच्या पूजेचे माहात्म्य.
२२ ग्रंथ वाचून मिळणारे फळ.
मल्हारी माहात्म्य या ग्रंथाशिवाय जयाद्री-माहात्म्य, मार्तण्ड-विजय हे खंडोबावरील इतर महत्वाचे ग्रंथ आहेत.
खंडोबाच्या लग्नकथा
 एक वाघ्या - खंडोबाला वाहिलेल्या पुरूषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात.
खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. तिस-या पत्नीचे नाव रमाबाई आहे. चौथी पत्नी फुलाई जातीने तेलीण आहे तर पाचवी चांदाई मुस्लिम आहे. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात खंडोबाच्या दोनच पत्न्यांचा उल्लेख येतो. म्हाळसा हा मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानन्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापा-याच्या घरात जन्मली. खंडोबाच्या स्वप्नात मिळालेल्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
दुसरी पत्नी बाणाई (बनाई ?) इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणा-यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छूक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संपप्त झाली. तेव्हा बायकांचा झगडा थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.
दंतकथा
  • सावकारी भुंगा[१४]: औरंगजेबाच्या दक्षिणेवरील मोहिमेवर असताना त्याने यवतजवळील दौलतमंगल किल्ला काबिज केला. तेथून त्याने जेजुरीचे मंदिर पाहिले व मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने सैन्य पाठवले. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आले असता त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे दिसले. त्यांनी सुरुंग लावून कोट उडविण्याचे ठरवले. पण जेथे सुरुंगासाठी भोक केले होते तेथून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी मुघल सैन्यावर हल्ल चढविला. सैन्य जेथे जाईल तेथे त्यांचा पाठलाग केला. मुसलमान सरदाराने या घटनेचा अर्थ एका हिंदूस विचारला तेव्हा त्याने खंडोबा हे कडक दैवत असून तुम्ही त्यास डिवचले यामुळे असे घडले असे सांगितले आता ही अस्मानी बंद करण्यासाठी तुम्हास काहीतरी करणे भाग आहे असे सांगितले. सरदाराने औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृतांत सांगितला. तेव्हा औरंगजेबाने सव्वा लाख रूपये खंडोबास नजर केले. अशी सावकारी रक्कम वसूल केल्यामुळे या भुंग्यांना सावकारी भुंगे म्हणतात. जेजुरी मंदिराच्या उजव्या दरवाज्याजवळील भुंगे सावकारी भुंगे म्हणून दाखवले जातात.
  • भाया भक्ताची साक्ष[१५]: एकदा कडेपठारावर (हे पठार जेजुरी मुख्य मंदिरानजिक आहे) धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला. पण आपला भक्त भाया येत आहे पाहून तो अदृश्य झाला. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्याजाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसला होता त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंड्ग सापडले. तेव्हा भायाने त्या लिंड्गाची प्रार्थना सुरू केली. वडिलधा-यांनी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंड्ग फेकून दिले तेव्हा लिंड्गाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि वडिलधारे विचारात पडले. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला तेव्हा ज्या कोणाची कु-हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले. अपेक्षेप्रमाणे भायाची कु-हाड रूतली आणि त्यातून रक्तदूधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले. पुढे मंदिराच्या वहिवाटीचा वाद उत्पन्न झाला असता वरिल कथा पेशवे दरबारात पुरावा म्हणून मांडण्यात आली होती. (सन १७५०)
उत्सव/यात्रा
  • जेजुरी: वर्षात चैत्री, पौषी, श्रावणी व माघी अशा चार मोठ्या यात्रा होतात. हे उत्सव देवाची विधीपूर्वक पूजा, विविध घराण्यांच्या मानाच्या पालख्यांचे व झेंड्याचे आगमन असे या यात्राउत्सवांचे स्वरूप असते. सुप्याचे खैरे, संगमनेरचे होलम आणि इंदूरच्या होळकरांना पालखीचा मान असतो.डफ, मर्फा,सनई, ताशा आदी वाद्यांच्या साथीने झेंड्यांच्या काठ्या शिखरास टेकवण्याची स्पर्धा चालते. जेजुरीगडावर हळदीची मुक्त उधळण होते. मुरळींचे नृत्य या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण असते. पौषी यात्रेस भरणारा गाढवांचा बाजार हे पौष यात्रेचे आकर्षण आहे.
सोमवती अमावस्येस (सोमवारी येणा-या अमवास्येस) खंडोबाच्या दर्शनास मोठी गर्दी जमते. सोमवतीस खंडोबा व म्हाळसा यांच्या पालख्यांची प्रातःपूजेनंतर सवाद्य मिरवणूक निघते. नंतर त्यांच्या प्रतिमांना कर्‍हा नदीवर स्नान घातले जाते.
  • नळदुर्ग: नळदुर्ग येथिल मंदिर खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे श्रावणी पौर्णिमेस खंडोबा व बानाई (दुसरे नावः पालाई) यांचा विवाह सोहळा पार पडतो.
  • पाली (सातारा जिल्हा): पालीचे मंदिर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरच्या अतित गावाजवळ असून हे मंदिरही खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे पौष पौर्णिमेस खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडतो.
स्थाने
 जेजुरी येथिल मंदिर
खंडोबाची खालील स्थाने आहेत. [१६]
  • जेजुरी (पुणे जिल्हा) (खंडोबा देवाचे मुख्य पीठ)
  • पाली (सातारा जिल्हा)
  • काळज ((ता. फलटण)(सातारा जिल्हा)
  • पिंपळगाव निपाणी ता. निफाड जि. नाशिक
  • मंगसुळी (बेळगाव जिल्हा)
  • देवरगुड्डा (राणीबेन्नूर)
  • मैलार लिंगप्पा (खानापूर, बेळगाव जिल्हा)
  • मैलारपूर (यादगीर) (बेळ्ळारी जिल्हा)
  • आदी मैलार (बीदर जिल्हा) (गुलबर्ग्याजवळ)
  • अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद जिल्हा)
  • माळेगाव (नांदेड जिल्हा)
  • सातारे (औरंगाबाद जिल्हा)
  • शेगुड (अहमदनगर जिल्हा)
  • निमगाव दावडी (पुणे जिल्हा)

Thursday, March 10, 2011

संभाजीराजे भोसले

संभाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
अधिकारकाळ जानेवारी, १६८१ - मार्च ११, १६८९
राज्याभिषेक जानेवारी, १६८१

राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र,  खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत राजधानी रायगड
पूर्ण नाव संभाजी शिवाजीराजे भोसले
जन्म १४ मे, १६५७,  पुरंदर किल्ला, पुणे
मृत्यू ११ मार्च, १६८९  वढु(पुणे)
उत्तराधिकारी राजाराम
वडील शिवाजीराजे भोसले
आई सईबाई
पत्नी येसूबाई
संतती शाहू महाराज
राजघराणे भोसले
चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)


लहानपण
संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
तारूण्य आणि राजकारण्यांशी मतभेद
१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. महाराजांचे अमात्य संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढय शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.
शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.
मोगल सरदार
या सगळ्या घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने लढवला पण शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.
संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. त्यांनी संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. मात्र संभाजीराजांच्या स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकर्‍यांमधील दरी अजूनच रूंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.
सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गादीचे हक्काचे वारसदार होते. तसेच शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते. सोयराबाईंनी संभाजीराज्यांना जेवणातून विष खाऊ घालण्याचाही प्रयत्न केला होता, अशी इतिहासात नोंद आढळते; पण ते बचावले असे वाचायला मिळते.

छत्रपती
१६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.
औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
१६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.

ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले , तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे कारण काय ? असे काय घडले होते , की औरंगजेब इतका दुखावला होता ? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली , ( ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब महाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता ?
शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत .' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबालासुद्धा लगावलेले आहेत.
औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते , जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते , ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं . तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं . त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता . तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं . एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी .’

दगाफटका
१६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले.
शारीरिक छळ व मृत्यू

त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.
बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.
अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.
बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.
कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.
दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!
मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

छत्रपती संभाजीराजे भोसले

आज या सूर्याचा अस्त झाला होता. त्यांना शत शत प्रणाम. 
आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.. 

Monday, March 7, 2011

जागतिक महिला दिन

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचं आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पसार झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच काही काही घरांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे..