Pages

Tuesday, March 22, 2011

छत्रपती शिवाजी महाराज जयंती
(तारखे प्रमाणे )

"निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"
-
समर्थ रामदास

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥
- महात्मा फुले!

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, ज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असे, तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती.
आजच्या या पावन दिनी जिजाऊ.कॉम तर्फे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

"
शिवरायांचे ते आठवावे रूप .. शिवारयांचा अठावावा प्रताप ... भूमंडळी " अशा आपल्या या अखंड प्रेरणा स्तंभाला आज परत एकदा स्मरण करण्याचे आवाहन जिजाऊ.कॉम आपणा सर्वांना करत आहे.


कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !
अरे छत्रपतीला स्मरा एकदा, शिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदर, अन तुम्हीच हो कोलंबस !
खरच आज गरज आहे त्या स्फूर्तीची, तमाम मावळ मातीमध्ये रुजवलेल्या त्या दिव्य स्वप्नाची, स्वराज्याच्या स्वप्नाची. सामान्य माणसाच्या स्वप्नातील स्वराज्याची, याच साठी शिवरायांनी जीवनभर एकच वसा घेतला होता तो म्हणजे माणसे घडवण्याचा आणि त्यांना एकत्र जोडण्याचा. आपल्या कर्मानेच आपल्या राष्ट्राची निर्मिती आथवा विकृती सुद्धा होत असते हा विचार त्यानी स्वराज्यातील लोकांमधे खोलवर रुजविला . म्हणूनच तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर, जिवा महाले असे अनेक ज्यांची इतिहासामधे साधी नोंद पण नाहीए असे लोक स्वराज्या निर्मिती च्या कार्या मधे कामी आले.त्या सर्वांच्या मनामधे एकच भावना होती ती म्हणजे-स्वराज्य निर्मिती हे आमचे कार्य आहे आणि आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण स्वराज्याची घौड्दौड, शिवबाची घौड्दौड कधी ही थांबली नाही पाहिजे! आज आपण पण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला काही बदल हवा असल्यास तो बदल आपणच घडवून आणला पाहिजे. लोकसभा किंवा विधानसभे मधे बदल घडवून आपल्या देशाचे भवितव्य बदलणार नाही; त्या साठी गरज आहे आपल्याला बदलण्याची, आपले विचार बदलण्याची, आपल्या विचारणा एक योग्या दिशा देण्याची. देशाची कमान जो पर्यंत एक दिशा आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणांकडे आसणार नाही तो पर्यंत या देशाला साक्षात ब्रम्हदेव सुद्धा वाचवू शकनार नाही. काळ फार कठीण आहे मित्राणो, गरज आहे आता आपल्यालाच पेटून उठण्याची, डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची, भाषेची आणि आपल्या संस्कृतीची सुरक्षा करण्याची; गरज आहे मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची!

शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर आसताना हे कार्य कठीण नाही, छ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाही, त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असते. शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि कधी आले तरी ते तुमच्या आमच्या हाता मधे ढाल-तलवार देणार नाहीत, आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे. शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडून, आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती, भाषा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहे; त्या साठी लढायचे आहे, तेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची ही वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाही. जिजाऊ मा साहेबांच्या, शिवबाच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला दिसेल.

चला तर मग जमेल तेथे जमेल त्या मार्गाने समाजातील अनिष्ट चालीरीती, जातीभेद, अज्ञान,
शासनातील किंवा इतर ठिकाणचा भ्रष्टाचार आणि एका प्रगत राष्ट्राला जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा विरोध करू!


शेवटी स्वाभिमानाच्या सूर्याला, पर्वतासारख्या खंबीर राजाला, जिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!

पुन्हा एकदा शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!

No comments:

Post a Comment