Pages

Friday, March 4, 2011

वेडात मराठे वीर दौडले सात........

वेडात मराठे वीर दौडले सात........
कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.

एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर.

यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं.

पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.

बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.

मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.

शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला! आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.

महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.

अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.

बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण पण सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.

अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.

प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.


वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा वर दिली आहे.

प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.

महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले.

पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही.

प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा!!!
तुमच्या प्रतिक्रिया नक्की टाका ||जय महाराष्ट्र||

2 comments:

  1. shabdasathi Maranari Lok.... Kay tyanchi Swamynishtha.... Abhiman vatato Marathi mhanun janmala Alyacha...

    ReplyDelete