Saturday, March 12, 2011

खंडोबा

खंडोबा हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा,बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे); कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. [१] खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र ; चतुर्भुज; कपाळाला भंडारा असे रूप असते
नावे
एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसर्‍या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे एक कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.
कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे: खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.
दैवत
 खंडोबा म्हाळसा मणीमल्लांचा संहार करताना (मूळ शिळाचित्राचे साल - १८८०)
खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे. [३] खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात.[४] खंडोबावरिल सर्वाधिक महत्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात असल्याचा दावा करतो पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही.[५] मुळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रूद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला. [६] खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तीपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटिय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बीदरजवळचे आदी मैलार स्थान आहे असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी -> नळदुर्ग -> पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला.[७] मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापा-यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा. पैठणच्या मराठी कंडक यक्षाशीही या देवतेचे एकीकरण झाले आहे.
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. एकनाथांनी या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून कमी प्रतीचे दैवत मानले गेले.[ संदर्भ हवा ] खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रीविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.
महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तण्ड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.[८]
जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. [९] बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.
कुळाचार
हे दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे.
  • जागरण - गोंधळ :
देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
  • तळी भरण:
तळी भरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरूषांद्वारे बेल भंडारा सुपारीने देवतेची ओवाळणी केली जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला असावा.
उपासना
बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्व असून कांदा त्यास आधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात. [११] याशिवाय रगडा भरित आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखवितात[१२] खंडोबाचे उपासक ब्राह्मणांसारख्या जातीव्यवस्थेतील वरच्या जातीपासून लिंगायत, धनगर, मराठा अशा सर्व जातंमध्ये आढळतात. हे दैवत सकाम दैवत असल्याने अनेक नवस केले जातात
मल्हारी माहात्म्य

संस्कृत व मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्वाचे स्थान दिले. हा ग्रंथ (बहुदा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने) इ.स.१२६० - १७४० च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे.[१३] खंडोबाने मणी व मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात बावीस अध्याय आहेत. ग्रंथाचा सर्वसाधारण गोषवारा असा -
अध्याय

वर्णन
१ मंगलाचरण, मणीचूर्ण पर्वतावरील सप्तऋषींच्या कुटिरांचे वर्णन, मल्हासूर कुटिरे उद्ध्वस्त करतो. ऋषी इंद्राकडे जातात.
२ इंद्रदरबाराचे वर्णन, इंद्राची मदत करण्याबाबत असमर्थता, वैकुंठात जाऊन विष्णूची मदत घेण्याचा सल्ला
३ वैकुंठाचे वर्णन, ऋषी विष्णूची स्तुती करतात व मदतीची याचना करतात.विष्णू ऋषींसोबत कैलास पर्वतावर येतात.
४ कैलास पर्वताचे वर्णन, कैलासाची शोभा बघून ऋषी व विष्णू यांना झालेला आनंद.
५ शंकराच्या महालाचे वर्णन.
६ शंकर-पार्वती यांच्या दिव्य रूपाचे वर्णन.
७ ऋषी शंकराची स्तुती करतात, शंकर ऋषीगणांस अभयदान देतो, धृतमरीचा जन्म.
८ शंकर मार्तंडभैरव अवतार घेतो, देवसैन्याचे वर्णन, युद्धास निघतात.
९ मल्लासूरास देवसेनेच्या आक्रमणाची खबर मिळते, दैत्यगणांची युद्धतयारी.
१० युद्धाचे वर्णन.
११ कार्तिकेय व खंडगदृष्याचे युद्ध, कार्तिकेयाचा विजय.
१२ गणपती व उल्कामुखाचे युद्ध,गणपतीचा विजय; नंदी व कुटिलोमाचे युद्ध नंदीचा विजय.
१३ मणीदैत्य व खंडोबाचे युद्ध, मणीचा वध.
१४ विष्णू मल्लासूरास समजावण्याचा प्रयत्न करतात, मल्लासूर सल्ला धुडकावून युद्धास जातो.
१५ धृतमरी आणि मल्लासूराचे युद्ध, धृतमरीचा पराभव.
१६ मल्लासूराचे व खंडोबाचे युद्ध, मल्लासूराचा पराभव.
१७ मल्लासूराकडून खंडोबाची स्तुती, खंडोबा मल्लासूरास वर देतो.
१८ ऋषींच्या विनंतीनुसार मणीमल्लांच्या वधस्थळी दोन लिंगे प्रकट होतात, देवगण त्यास्थळी तीर्थयात्रेसाठी येतात.
१९ प्रेमपुरी यात्रेचे महत्व, .
२० प्रेमपुरी स्थळाचे वर्णन.
२१ खंडोबाच्या पूजेचे माहात्म्य.
२२ ग्रंथ वाचून मिळणारे फळ.
मल्हारी माहात्म्य या ग्रंथाशिवाय जयाद्री-माहात्म्य, मार्तण्ड-विजय हे खंडोबावरील इतर महत्वाचे ग्रंथ आहेत.
खंडोबाच्या लग्नकथा
 एक वाघ्या - खंडोबाला वाहिलेल्या पुरूषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात.
खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. तिस-या पत्नीचे नाव रमाबाई आहे. चौथी पत्नी फुलाई जातीने तेलीण आहे तर पाचवी चांदाई मुस्लिम आहे. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात खंडोबाच्या दोनच पत्न्यांचा उल्लेख येतो. म्हाळसा हा मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानन्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापा-याच्या घरात जन्मली. खंडोबाच्या स्वप्नात मिळालेल्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
दुसरी पत्नी बाणाई (बनाई ?) इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणा-यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छूक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संपप्त झाली. तेव्हा बायकांचा झगडा थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.
दंतकथा
  • सावकारी भुंगा[१४]: औरंगजेबाच्या दक्षिणेवरील मोहिमेवर असताना त्याने यवतजवळील दौलतमंगल किल्ला काबिज केला. तेथून त्याने जेजुरीचे मंदिर पाहिले व मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने सैन्य पाठवले. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आले असता त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे दिसले. त्यांनी सुरुंग लावून कोट उडविण्याचे ठरवले. पण जेथे सुरुंगासाठी भोक केले होते तेथून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी मुघल सैन्यावर हल्ल चढविला. सैन्य जेथे जाईल तेथे त्यांचा पाठलाग केला. मुसलमान सरदाराने या घटनेचा अर्थ एका हिंदूस विचारला तेव्हा त्याने खंडोबा हे कडक दैवत असून तुम्ही त्यास डिवचले यामुळे असे घडले असे सांगितले आता ही अस्मानी बंद करण्यासाठी तुम्हास काहीतरी करणे भाग आहे असे सांगितले. सरदाराने औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृतांत सांगितला. तेव्हा औरंगजेबाने सव्वा लाख रूपये खंडोबास नजर केले. अशी सावकारी रक्कम वसूल केल्यामुळे या भुंग्यांना सावकारी भुंगे म्हणतात. जेजुरी मंदिराच्या उजव्या दरवाज्याजवळील भुंगे सावकारी भुंगे म्हणून दाखवले जातात.
  • भाया भक्ताची साक्ष[१५]: एकदा कडेपठारावर (हे पठार जेजुरी मुख्य मंदिरानजिक आहे) धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला. पण आपला भक्त भाया येत आहे पाहून तो अदृश्य झाला. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्याजाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसला होता त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंड्ग सापडले. तेव्हा भायाने त्या लिंड्गाची प्रार्थना सुरू केली. वडिलधा-यांनी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंड्ग फेकून दिले तेव्हा लिंड्गाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि वडिलधारे विचारात पडले. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला तेव्हा ज्या कोणाची कु-हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले. अपेक्षेप्रमाणे भायाची कु-हाड रूतली आणि त्यातून रक्तदूधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले. पुढे मंदिराच्या वहिवाटीचा वाद उत्पन्न झाला असता वरिल कथा पेशवे दरबारात पुरावा म्हणून मांडण्यात आली होती. (सन १७५०)
उत्सव/यात्रा
  • जेजुरी: वर्षात चैत्री, पौषी, श्रावणी व माघी अशा चार मोठ्या यात्रा होतात. हे उत्सव देवाची विधीपूर्वक पूजा, विविध घराण्यांच्या मानाच्या पालख्यांचे व झेंड्याचे आगमन असे या यात्राउत्सवांचे स्वरूप असते. सुप्याचे खैरे, संगमनेरचे होलम आणि इंदूरच्या होळकरांना पालखीचा मान असतो.डफ, मर्फा,सनई, ताशा आदी वाद्यांच्या साथीने झेंड्यांच्या काठ्या शिखरास टेकवण्याची स्पर्धा चालते. जेजुरीगडावर हळदीची मुक्त उधळण होते. मुरळींचे नृत्य या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण असते. पौषी यात्रेस भरणारा गाढवांचा बाजार हे पौष यात्रेचे आकर्षण आहे.
सोमवती अमावस्येस (सोमवारी येणा-या अमवास्येस) खंडोबाच्या दर्शनास मोठी गर्दी जमते. सोमवतीस खंडोबा व म्हाळसा यांच्या पालख्यांची प्रातःपूजेनंतर सवाद्य मिरवणूक निघते. नंतर त्यांच्या प्रतिमांना कर्‍हा नदीवर स्नान घातले जाते.
  • नळदुर्ग: नळदुर्ग येथिल मंदिर खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे श्रावणी पौर्णिमेस खंडोबा व बानाई (दुसरे नावः पालाई) यांचा विवाह सोहळा पार पडतो.
  • पाली (सातारा जिल्हा): पालीचे मंदिर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरच्या अतित गावाजवळ असून हे मंदिरही खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे पौष पौर्णिमेस खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडतो.
स्थाने
 जेजुरी येथिल मंदिर
खंडोबाची खालील स्थाने आहेत. [१६]
  • जेजुरी (पुणे जिल्हा) (खंडोबा देवाचे मुख्य पीठ)
  • पाली (सातारा जिल्हा)
  • काळज ((ता. फलटण)(सातारा जिल्हा)
  • पिंपळगाव निपाणी ता. निफाड जि. नाशिक
  • मंगसुळी (बेळगाव जिल्हा)
  • देवरगुड्डा (राणीबेन्नूर)
  • मैलार लिंगप्पा (खानापूर, बेळगाव जिल्हा)
  • मैलारपूर (यादगीर) (बेळ्ळारी जिल्हा)
  • आदी मैलार (बीदर जिल्हा) (गुलबर्ग्याजवळ)
  • अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद जिल्हा)
  • माळेगाव (नांदेड जिल्हा)
  • सातारे (औरंगाबाद जिल्हा)
  • शेगुड (अहमदनगर जिल्हा)
  • निमगाव दावडी (पुणे जिल्हा)

No comments:

Post a Comment